कै. रमेश शंकरराव पालकर – खो खो क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव. बडोदा (गुजरात) येथे जन्म झालेल्या पालकर सरांना उपजतच व्यायामाची व खेळाची आवड असल्याने लाठी, फरीगदगा, लेझीम, सूर्य नमस्कार, दंड बैठका, मल्लखांब, कुस्ती, भालाफेक या सोबतच हुतुतू, खो खो व आटयापाटया या मैदानी खेळातही त्यांचे प्राविण्य कौतुकास्पद होते. म्हणूनच वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी सरांनी प्रथम श्रेणीचा खो खो सामना श्री जुम्मादादा व्यायाम मंदिरातर्फे, गुजराथ क्रीडा मंडळाविरुद्ध खेळून संरक्षण व आक्रमणात विशेष कामगीरीही केली.

१९४५ साली मुंबई प्रस्थान आल्यावर दादरच्या श्री समर्थ व्यायाम मंदिरात खो खोचा सराव घेण्यास सुरवात केली आणि बघता बघता श्री समर्थ व्यायाम मंदिराचा दर्जेदार संघ निर्माण होऊ लागला. सरांच्या कर्णधार पदाखाली श्री समर्थ व्यायाम मंदिराने मुंबईतील त्या काळातील अग्रेसर संघ समर्थ क्रीडा मंडळ, आंग्रेवाडी, गिरगाव संघास अंतिम सामन्यात पराभूत करून एक नवे पर्व सुरु केले. श्री. आनंद गोखले सरांची बळकट साथ त्यांना मिळाली त्यानंतर समर्थ व्यायाम मंदिराने कधीच हार पत्करली नाही. याच काळात सरांनी लोकसेवेच्या कार्यात रस घेतला. परंतु समर्थ व्यायाम मंदिराच्या व्यवस्थापनाशी ताळमेळ न जुळल्याने सरांनी समर्थ व्यायाम मंदिर सोडले.

लोकसेवेच्या कार्यात समविचारी उत्साही युवकांचा एक संघ सरांसोबत होता. या युवकांनी समाजसेवा करतानाच मैदानी खेळांचे महत्वही जाणले आणि याच उत्साही युवकांना घेऊन दिनांक १५ ऑगस्ट, १९४७ रोजी विजय क्लबची स्थापना झाली. पहिल्या दशकाची वाटचाल अध्यक्ष कै. सोमनाथ (उर्फ अप्पा) कुलकर्णी यांच्या कुशल नेतृत्वाखाली सुरु झाली.

विजय क्लबच्या क्रीडांगणाची अडचण कै. नरुभाऊ पाटील यांच्या वडिलांनी सोडविली. पालकर सरांचे संघटन कौशल्य, प्रशिक्षण तंत्र ह्याला कै. नरुभाऊंची साथ मिळाली. या सर्व कार्यात कै. महाबळ गुरुजी. कै. आबासाहेब जोग, पुण्याचे श्री. शंकरराव पाटणकर अश्या मान्यवरांचे मार्गदर्शन विजय क्लबला मिळाले. कै. नरुभाऊंनी लंगडीसाठी तयार केलेले छोटे छोटे खेळाडू घेऊन खो खो ची जडणघडण तर शरद व मनोहर पालकर बंधू, विजय पाटणकर यांनी महिलांचा हुतुतू संघ बांधला.

सुरवातीला विजय क्लबचा हुतुतु व लंगडीचा संघ म्हणून नावलौकिक होता पण लंगडी खेळता खेळता खो खोचा क्लबही उभा राहिला. लंगडी, खो खो, हुतुतू खेळतानाच क्लबने आटयापाटया याही भारतीय खेळावर लक्ष केंद्रित केले. मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाच्या एका वर्षी लंगडी, खो खो, हुतुतू या तीनही खेळात अंतिम विजय संपादन करून एक नवीनच विक्रम प्रस्थापित केला. मुंबई प्रमाणेच परगावी सुद्धा विजय क्लब सगळ्याच खेळात हिरीरीने भाग घेत होता. त्यातही ठाणे, पंढरपूर, पुणे सांगली,अमरावती, इंदोर ठिकाणी विजयी संपादन केले. १९५५ साली तरुण भारत व्यायाम मंडळाच्या सांगली क्रीडा महोत्सवात क्लबचे खो खो मुले (२ संघ), लंगडी मुले (१ संघ) तर हुतुतू, खो खो व लंगडीत मुलींचे प्रत्येकी १ संघ सहभागी झाला होता. एका खाजगी संस्थेचे एवढे संघ एकाच वेळी एकाच स्पर्धेत बाहेरगावी जाण्याचे भारतीय क्रीडाक्षेत्रातील हे पहिलेच उदाहरण होते.

खो खोत कुमुद पुरंदरे, कुसुम गोखले, विभवा नवाथे, हिंदळेकर भगिनी, काणेकर भगिनी, मृणाल वागळे या अष्टपैलू महिला खेळाडूंचा तर आजगावकर बंधू, राजा जेस्ते,प्रल्हाद दुधवडकर, विलास सापळे, बळवंत भागवत, शरद कुलकर्णी, सुधाकर शिरोडकर, सुर्यकांत भगत या पुरुष खेळाडूंचा क्लबला मोठा आधार मिळाला. पालकर सरांची कडक शिस्त, नियमित सराव व शालेय शिक्षणावर करडी नजर यामुळे विजय क्लब हुतुतू, खो खो, लंगडी व आटयापाटया खेळात मुंबईसह महाराष्ट्रात नावारूपाला आला.

१९५७ साली व्यापारी तुफान मंडळ, पंढरपूर येथील यशस्वी दौरा, रोहा येथील अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण परिषदेच्या स्पर्धेत पुरुष व महिला दोन्ही संघाचे कर्णधार पद, १९६० सालापर्यंत इंदौर, वांडरर्स-इंदौर, सन्मित्र संघ-पुणे, अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण परिषदेच्या नागपूर येथील स्पर्धा, तरुण भारत व्यायामशाळा – सांगली,विजय मंडळ – अमरावती, राज्य क्रीडा महोस्तव- पुणे अशा अनेक स्पर्धांमध्ये महत्वाचा सहभाग.

१९६६ साली कराड येथील पहिल्या राष्ट्रीय स्पर्धेत राजा आजगावकर यांनी महाराष्ट्राचे कर्णधार पद सांभाळले. तर मोहन आजगावकर यांना एकलव्य पुरस्कार मिळाला. अगदी चित्रपट सृष्टीतील नामवंत कलाकार सतीश पुळेकर व रमेश भाटकर यांनीही क्लबच्या संघातून अनेक स्पर्धा गाजविल्या. क्लबचे अनेक खेळाडूं इन्कम टक्स,कस्टम्स, माझगाव डॉक्स, मोरारजी मिल, खटाव मिल हया सारख्या नामवंत व्यवस्थापनातर्फे खो खो खेळले.

शिव छत्रपती विजेते खेळाडू

अनु. खेळाडूचे नाव पुरस्कार वर्ष फोटो
1 पांडुरंग परब १९८२-८३
2 बिपीन पाटील १९८९-९०
3 विवेक आंबे १९९०-९१
4 नितीन जाधव १९९१-९२
5 वैशाली वेदक १९९१-९२
6 एजास शेख १९९४-९५
7 ललित सावंत १९९७-९८
8 दीप्ती दळवी २००२-०३
9 मनीष बडंबे २००३-०४