सन १९७​४ साली सरस्वती शाळेचे प्रशिक्षक माने यांनी शाळेतील मुलांना खो-खो खेळ शिकविण्यासाठी कोरे सरांना निमंत्रित केले होते. कोरेसर त्यावेळी ठाणे येथील कंपनीत कार्यरत होते तसेच ते तत्कालीन मुंबईत नावाजलेल्या ​विदयुत संघाचे प्रतिनिधित्व केले होते. सरस्वती शाळेच्या मैदानात सरांनी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत शाळेतील मुलांचा लंगडी व खो-खो खेळाचा नियमितपणे सराव घेण्यास सुरवात केली. सरांची सरावाबाबत असलेली सक्ती, नियमितपणा तसेच त्यांच्या राहणीमानातील निटनेटकेपणा व लोभस वकृत्वाचा प्रभाव मुलांवर पडला. अल्पावधीतच शाळेतील विद्यार्थी लंगडी व खो-खो खेळाकडे वळू लागले. सरांचे योग्य मार्गदर्शन व नियमित सरावाच्या जोरावर सरस्वती शाळेचा संघ आंतर स्पर्धांमध्ये विजय मिळवू लागला. सन १९७६ ते ​१९८०​​ या कालावधीत शाळेने अनेकवेळा मानाचा हिंद करंडक जिंकला.

या काळात अनेक खेळाडू शालेय शिक्षण समाप्त झाल्याने शाळा सोडून जात होते त्यामुळे त्यांचा खेळाशीही संबंध तुटत होता. त्यांची खो-खो खेळाशी असलेली नाळ तुटू या हेतूने सरांनी तत्कालीन सरांशी बोलून सरस्वती स्पोर्ट्स क्लब या नावाने खो-खोचा संघ सुरु केला. वास्तविक पाहता सरांना साथ देण्यासाठी तसे तोलामोलाचे साथीदार नव्हते मात्र माने सरांची साथ तसेच सरस्वती शाळेच्या व्यवस्थापन मंडळाने सरावासाठी मैदान उपलब्ध करून देऊन सहकार्याचा हात दिल्याने सरांनी त्या काळातील त्यांचा मित्र तंबी, किशोर सावंत व खेळासाठी मैदानात झोकून देणार्‍या खेळाडूंच्या सहकार्याने सरांनी हा मेरु पर्वत उचलण्याचा पर्यंत केला व तो यशस्वी हि झाला हे कालानुरूप सिद्ध झालेच आहे.

सरस्वती स्पोर्ट्स क्लब व कोरे सर हे एक घट्ट मिश्रण तयार झाले होते. सर कडक शिस्तीचे भोक्ते होते. मात्र खेळाडूंनी खेळाइतकाच अभ्यासही केला पाहिजे यावर त्यांचा कटाक्ष असायचा. मुलांचे प्रगती पुस्तक नियमितपणे तपासले जायचे, अभ्यास व खेळाच्या प्रगतीबाबत ते शिक्षक व पालक यामध्ये समन्वयाची भूमिका बजावयाचे तसेच जवळजवळ सर्वच मुलांच्या पालकांशी घरोब्याचे संबंध होते. से दादर येथे राहत होते. नोकरीला ​अनब्राको या कंपनीत ठाणे येथे जात. प्रवासाची एवढी दगदग करून संध्याकाळी दररोज न चुकता सराव घेण्यासाठी नीटनेटके कपडे करून सर मैदानात हसतमुखाने हजर असायचे. मुलांना सर्व सामने खेळण्यापूर्वी ठाणे येथे घेऊन जाणे, त्यांचा प्रवास खर्च, मुलांचे गणवेश व इतर कामासाठी लागणारा पूर्ण खर्च सर एकटयाने हा सर्व भार पेलायचे. यासाठी कधीही मुलांकडून एक छदामही घेतला गेला नाही. या एका माणसाने एवढया सर्व गोष्टी कशा पेलल्या हे त्यांना व ईश्वरालाच ठाऊक. खरच सरांनी तन, मन, धन देऊन सरस्वती या संस्थेचे इवलस रोपट लावल, आज त्याचा वटवृक्ष झाला आहे.

सन ​१९८४ साली संघाने​​ ​कै. भाई नेरुरकर चषक जिंकला. हळूहळू संघ आकार घेत होता. सन १९७९ ला संघाचा पहिला खेळाडू मुंबईच्या पुरुष संघात निवडला गेला. याच काळात तत्कालीन मुंबई खो-खो संघटनेचे सचिव श्री. उन्मेष शेणोय यांनी सरांना संघटनेत काम करण्यासाठी येण्यासाठी सुचविले मात्र कोरे सरांनी त्यास नम्रपणे नकार देवून मी मैदानातच काम करणार मला राजकारण जमणार नाही, आपणास हवा असल्यास माझा एक खेळाडू देतो त्याचा विचार करावा. त्याप्रमाणे सन १९८९ साली सरस्वतीचा पहिला कार्यकर्ता श्री. तुषार सुर्वे संघटनेत दाखल झाला. त्यांनी मुंबई खो-खो संघटनेत १४ वर्षे खजिनदार, सचिव, उपाध्यक्ष हि पदे व सन २०१२ पासून आजतागायत महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे खजिनदार पद भूषवित आहेत. श्री तुषार सुर्वे यांची हि प्रगती पाहून सरांनी त्यांची त्यावेळी केलेली निवड किती योग्य व सार्थ होती हे दाखवून दिले. मात्र यातून सरांमधील दूरदर्शीपणाचा गुण दिसून येतो.

सुरवातीच्या काळात संस्थेचा दिनेश परब हा खेळाडू बँक ऑफ इंडिया येथे व्यवसायिक खेळाडू म्हणून नोकरीस लागला. याच दरम्यान युवकचे श्री. आबा नाईक यांच्या सहकार्याने रंजन कोळी व प्रवीण सिंदकर मोरारजी मिलमध्ये कामास लागले. कालांतराने रंजन कोळी बँक ऑफ इंडिया व पैगावकर सरांच्या अथक परिश्रमाने तयार झालेल्या रिझर्व बँक ऑफ इंडियात प्रवीण सिंदकर नोकरीस लागला.

सन १९८३-८४ च्या सुमारास संघ उभारी घेत होता. पत्र संघाला अपेक्षित यश मिळत नव्हते. मुंबई बाहेर होणार्‍या निमंत्रित स्पर्धांमध्ये संघाला प्रवेश मिळत नव्हता. यामुळे भविष्यात आपले नुकसान होईल या भीतीने काही खेळाडू दुसर्‍या संघात डेरेदाखल झाले. यावेळी सरांना झालेले दु:ख कोणीही समजू शकले नाही. संघ उभारी घेत असताना सरांना बसलेला हा एक धक्काच होता. मात्र सरांनी याही परिस्थितीत डगमगून न जाता मैदानावर वीर योद्ध्याप्रमाणे धीरोदत्तपणे उभे राहून नवनवीन खेळाडू एखाद्या मुर्तीकाराप्रमाणे घडवतच राहिले. या सुमारास किशोर-किशोरी, कुमार-कुमारी या संघाचा मुंबईत दबदबा होता. त्या काळात महेंद्र सावंत, प्रदीप सिंदकर, भुजबळ, यादव, मंदार म्हात्रे अश्या कित्येक खेळाडूंनी पुढे मैदाने गाजविली. संघ परत उभारी घेत होता. सरांना सन

​​ ​१९८९-९० साली महाराष्ट्राच्या पुरुष संघाचे प्रशिक्षक पद दिले गेले. सदोदित शिस्तीचे पालन करणार्‍या आपल्या खेळाडूंचे कधीही वाकडे पाऊल पडणार नाही याची सर्वोतोपरी काळजी घेणार्‍या सरळमार्गी सरांचे दिनांक २५ मे, १९९​​२​ रोजी रात्री दादर येथे पत्नीसह रस्ता ओलांडताना अपघातात दु:खद निधन झाले.सरांचे एक स्वप्न होते, मुंबई जिल्हा पुरुष अजिंक्यपद स्पर्धा जिंकण्याचे. मात्र सर जिवंत असताना त्यांचे स्वप्न पूर्ण करता आले नाही मात्र सन ​१९९७ साली विजय क्लब या मुंबईतील बलाढय संघाला अंतिम फेरीत पराजीत करून खेळाडूंनी ते स्वप्न पूर्ण केले.

कोरे सरांच्या अपघाती निधनानंतर सरस्वती संघ बंद होतो का ? अशी भीती वाटत होती. मात्र तुषार सुर्वे यांनी सरांचा विश्वास सार्थ ठरवीत संघाला या संकटातून सुखरूप किनार्‍याला आणले. या कामात आणखी एका व्यक्तीचे योगदान तेवढेच महत्त्वाचे आहे. सरांबरोबर सुरवातीच्या काळात काम करणारे व गेली ३९ वर्ष अथकपणे मैदानावर येणारे श्री. किशोर सावंत सर. त्यांच्या मेहनतीनेच सरस्वती संघाकडे खेळाडूंचा ओघ राहत आहे. सरस्वती शाळेतील विद्यार्थी जमवून त्यांच्याशी तसेच त्यांच्या वर्गशिक्षकांशी बोलून मुलांना सरावालापूर्ववत करणे तसेच सरांनंतर मैदानात संघाचा सराव घेण्याची कामगिरी पार पाडलेले दिवाकर, सुधाकर राऊळ बंधू, राजेश येरझल, नगरे बंधू, महेश करमळकर खेळाडूंना आर्थिक, गणवेश, शालोपयोगी वस्तू देऊन त्यांना मदत करणारे संतोष सावंत, डलेश देसाई यांचाही या वाटचालीत सिंहाचा वाटा आहे.

​संस्थेला​​​ सन १९९७-९८ साली प्रवीण रामचंद्र सिंदकर याने एकलव्य पुरस्कार​ मिळविला तर महाराष्ट्र शासनाचा श्री शिवछत्रपती खेळाडू पुरस्कार हा मान श्री. मंदार म्हात्रे याने २००२-०३ साली मिळविला. प्रवीण सिंदकर हा सन ​१९८२ साली सर्वप्रथम ​महाराष्ट्र्राच्या पुरुष संघात निवडला गेला व त्यानंतर ​१९९७ साली परत वयाच्या ४२ व्या वर्षी निवड होऊन तो महाराष्ट्राच्या संघात निवडला गेला.

​त्याने वयाच्या ४७ वर्षापर्यंत ​​मुंबईच्या जिल्ह्याच्या संघातून खेळ केला. याशिवाय अनेक खेळाडूंनी मैदाने गाजविली. संस्थेचे ​सदस्य व ​​​महाराष्ट्र राज्याचे विधान परिषद सदस्य ​श्री. अनिल दत्तात्रय परब​ हे ​​१९८९ ते २००० पर्यंत ​​मुंबई खो खो संघटनेत कार्यरत होते व त्यांनी अध्यक्ष म्हणून सुद्धा जबाबदारी पार पाडली. सध्या संस्थेचे श्री. तुषार सुर्वे हे उपाध्यक्ष, श्री. सुधाकर राऊळ हे कार्योपाध्यक्ष तर श्री. डलेश देसाई व श्री. महेश करमळकर हे मुंबई खो-खो संघटनेत सदस्य म्हणून कार्यरत आहेत.​

शिव छत्रपती विजेते खेळाडू

अनु. खेळाडूचे नाव पुरस्कार वर्ष फोटो
1 मंदार म्हात्रे २००२-०३
2 सुधीर म्हस्के २००५-०६