स्वातंत्र्यपूर्व काळात देशभर स्वातंत्र्य चळवळींचे वारे जोरदारपणे वाहत होते. फाळणीनंतरच्या जातीय दंग्यांच्या काळात हिंदू-मुसलमानांचा परस्परांवरील विश्वास उडाला होता. त्यावेळच्या असुरक्षिततेच्या वातावरणात दादर विभागातील काही तरुणांनी एकत्र येऊन दादर नागरिक दलाची स्थापना केली. गस्त, पहारे सुरू झाले. यातूनच हुतूतू प्रेमी राजा शेट्ये आणि नारायण पडते यांची व प्रकाशभाईंची ओळख झाली. फारसा प्रतिसाद न मिळालेली हुतूतू स्पर्धा राजाभाऊ शेट्ये आणि नारायण पडते यांनी सुरू करून यशस्वी केली. हुतूतूचे सामने भरवण्यापासून सुरू झालेल्या कार्यातून मग चर्चासत्रे व व्याख्यानमाला आयोजित करण्याची कल्पना पुढे आली. नंतर बॉम्बे टाईपरायटींग इन्स्टिट्यूटमध्ये सर्व उत्साही कार्यकर्त्यांची सभा झाली. प्रकाशभाई मोहाडीकरांनी ‘अमर हिंद मंडळा’ची घटना, नियम यांचा आराखडा आपल्या सहका-यांसमोर मांडला. एकमताने तो मंजूरही झाला. आणि ‘अमर हिंद मंडळा’ची स्थापना २६ जानेवारी १९४७ रोजी झाली. पहिला उपक्रम म्हणून ‘वसंत व्याख्यानमाला’ आयोजित करण्याचे ठरविले. मंडळाची स्थापना होऊनही मंडळाला स्वतःची जागा नव्हती.

मंडळाला स्वतःचा निवारा, आसरा हवा होता. कार्यकर्त्यांना एकत्र येण्यासाठी हक्काची जागा आवश्यक होती. शेवटी इंजिनीयर नानासाहेब मोडक यांच्यामुळे ती समस्याही सुटली. दादरला ज्या जागेत ‘अमर हिंद मंडळ’ उभे आहे, ती जागा कुर्ला चर्चची होती. मोडक यांनी कुर्ला चर्चच्या मंडळींशी चर्चा करून आज ‘अमर हिंद मंडळा’ची वास्तु जिथे उभी आहे, ती जागा ९९ वर्षांच्या दीर्घ मुदतीच्या करारावर मिळवली. एवढा पूर्वेतिहास वाचल्यावर वाचकांच्या मनात ती जागा कुठे आहे असा प्रश्न नक्कीच निर्माण झाला असेल.

अमर हिंद मंडळात जावे कसे?

मुंबईतील पश्चिम दादरला रानडे मार्गाने चालत जाताना गोखले पथ (उत्तर) सुरू होतो. तिथे डाव्या हाताला काटकोनात वळून गोखले पथावरून पोर्तुगीज चर्चच्या दिशेने चालू लागले की, समोरच्या पदपथावर ‘अमर हिंद मंडळ’ दिसतं.

गेली सहा दशके हे मंडळ कार्यरत आहे. दर्शनी द्वार ओलांडून आतमध्ये प्रवेश करताच प्रथम इमारत लागेल, तेथेच सभागृह, त्याच्यासमोर विस्तीर्ण मैदान. हे मैदान अनेक बौद्धिक, शारीरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे साक्षीदार आहे. येथे मैदानी खेळांपासून, एकांकिका, बालनाट्य स्पर्धा अशा अनेक स्पर्धाही रंगल्या, पण या सर्वांत सदैव अग्रस्थान मिळत आहे, ते या ‘वसंत व्याखानमाले’ला. कारण ‘अमर हिंद मंडळा’चा तो एक अविभाज्य घटक आहे. सुप्रसिद्ध व्याख्यानमालेचे पहिले ज्ञानसत्र १५ एप्रिल १९४८ ते २२ एप्रिल १९४८ या आठ दिवसांत आयोजित करण्यात आले. ही व्याख्यानमाला डॉ. डिसिल्व्हा हायस्कूल कंपाऊंड येथे सुरू झाली. वार्षिक वसंत व्याख्यानमाला हे या ‘अमर हिंद मंडळा’चे प्रमुख वैशिष्ट्य आहे. १९४८ सालापासून गेली ६२ वर्षे अखंडितपणे ‘वसंत व्याख्यानमाला’ आयोजित करणारी महामुंबई आणि आसपासच्या परिसरातील ही एकमेव संस्था आहे.

महाराष्ट्रात प्रथम वसंत व्याख्यानमालेची सुरुवात १२५ वर्षांपूर्वी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी सुरू केली. पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेने १२५ वर्षांच्या परंपरेत मानाचे स्थान निर्माण केले आहे. पुण्याची वसंत व्याख्यानमाला सुरू करताना न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी ज्ञानप्रसारक व विचार जागृती मुक्तपणे आणि मोठ्या प्रमाणावर झाल्याशिवाय देशोन्नती होणे शक्य नाही, हा विचार व्यक्त केल्यानंतर वसंत व्याख्यानमाला उदयास आली होती. वसंत व्याख्यानमाला सांस्कृतिक जीवनाचा वैभवशाली पैलू असून विचार स्वातंत्र्य हे वसंत व्याख्यानमालेच्या व्यासपीठाचे अधिष्ठान आहे. वसंत व्याख्यानमालेत भाषण केल्यानंतर त्यांच्या भाषणातून विविध वादविवाद निर्माण झाले. मात्र या वादातून वैचारिक मंथनातून अमृत निर्माण झाल्याच्या घटना आहेत.

महाराष्ट्रात पहिली वसंत व्याख्यानमाला पुणे येथे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी तर मुंबईत पहिली वसंत व्याख्यानमाला साने गुरुजींचे शिष्य प्रकाशभाई मोहाडीकर यांनी सुरू केली. मुंबईत १९४७ ते ५७ च्या दशकांत मात्र श्रोत्यांची उपस्थिती कमी झाली होती. या दशकांत महाराष्ट्रात ‘संयुक्त महाराष्ट्र आंदोलन’ सुरू झाले आणि वैचारिक देवाणघेवाण, वादविवादाचे राजकारण सुरू झाले आणि या व्याख्यानमालेचे श्रोते वाढू लागले. मधल्या काळात मंडळावर अनेक संकटे ओढवली. अनंत अडचणींना तोंड द्यावे लागले, आर्थिक समस्या निर्माण झाल्या तरीही या व्याख्यानमालेत कधीही खंड पडला नाही. सारे कसे दृष्ट लागल्यासारखे चालले होते.

कुस्तीसाठी हौद बांधावा, हुतूतू, खो खो, बॅण्ड पथकाची उभारणी, व्यायाम शाळा अशा अनेक उपक्रमांवर भर दिला जाऊ लागला. पण त्याचबरोबर ‘अमर हिंद मंडळ’ एक सांस्कृतिक केंद्र झाले पाहिजे, व्यायामातून सुदृढ झालेले शरीर समाजाच्या उपयोगी पडावे अशी धारणा प्रकाशभाई मोहाडीकरांची होती. उण्यापु-या पाच वर्षांच्या काळात त्यांनी मंडळाला स्थैर्य, प्रसिद्धी आणि महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात मानाचे स्थान मिळवून दिले!

कालातंराने प्रकाशभाईं व नंतर राजाभाऊ शेट्ये यांनी मंडळातील सहभाग कमी केला मंडळाच्या कार्याला एकदम खीळ बसली. संस्थापक आबा पडते तेव्हा अक्षरशः एकाकी पडले होते. मंडळ कर्जबाजारी होते. मंडळ बंद पडू नये म्हणून आबा पडते यांची धडपड सुरू होती. त्या विपन्नावस्थेच्या काळात आबा पडते यांनीच मंडळाचे अस्तित्व टिकविण्यासाठी एकाकी झुंज दिली. शर्थीचे प्रयत्न केले. मंडळाची जागा, मंडळाची वास्तू हडप करण्यासाठी बरेच जण टपले होते. कुणाला शाळेसाठी जागा हवी होती, तर आणखी कुणी येथे भव्य इमारत उभी करण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यांना आबांनी दाद दिली नाही. धमक्यांना भीक घातली नाही. सा-यांना ते ठाम नकार देत राहिले.

पुढे १९७०च्या दशकात नव्या विचाराच्या दमदार कार्यकर्त्यांची फळीच मंडळाच्या संरक्षणासाठी पुढे आली, त्यात भाई मयेकर, अड. मुकुंदराव तिवरेकर. त्यानंतर १९८० मध्ये विद्युत मंडळाचे उमेश शेणॉय, अरुण देशपांडे, सतीश रेडीज, श्रीकृष्ण राणे आणि चिंतामणी नागले ही मंडळी पुढे सरसावली. त्यांनी जिद्दीने कामाला सुरुवात केली. त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत गेला. त्यांनी मंडळाच्या डोक्यावरील सारे कर्ज दूर करून आर्थिक बाजू भक्कम केली. मंडळाच्या ध्येय धोरणाप्रमाणे समाजसेवी कार्यक्रमाला चालना मिळाली. नवे नवे उपक्रम कार्यान्वयित होऊ लागल्यामुळे उत्साह वाढतच गेला. मग मात्र मंडळाने कधीच मागे पाहिले नाही.

प्रकाशभाई मंडळापासून दूर झाले असले, तरी व्याख्यानमालेच्या योजनात ते सातत्याने मदत करीत राहिले. अमर हिंद मंडळात असताना त्यांनी व्याख्यानमालेला जोडून संगीत महोत्सव साजरा केला. या महोत्सवात लता मंगेशकर, आशा भोसले, मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर, हिराबाई बडोदेकर, राम मराठे, सरस्वती राणे, तबला नवाज अल्लारखाँ आणि बालगंधर्व अशा दिग्गज गायक-गायिकांनी, वादकांनी आपल्या कलेचा आविष्कार प्रकट केला. महंमद रफी या संगीत महोत्सवात गायिले. अनिल मोहिले यांनी या वेळी बाल कलाकार म्हणून जलतरंगाचा श्रुती मधुर आविष्कार प्रकट केला.
‘अमर हिंद मंडळा’ने आयोजित केलेल्या नाट्य महोत्सवात आचार्य अत्रे लिखित ‘कवडी चुंबक’ या नाटकाचा प्रयोग झाला. त्यात स्वतः आचार्य अत्रे, वसंत बापट, शिरीष पै, अप्पा पेंडसे आणि प्रबोधनकार ठाकरे यांनी कामे केली होती. स्वतः प्रकाशभाईंनी देखील या नाटकात छोटीशी भूमिका केली होती ‘अमर हिंद मंडळा’तील हा संस्मरणीय नाट्यप्रयोग ठरला.

‘अमर हिंद मंडळा’ने वसंत व्याख्यानमालेसोबत इतर अनेक कार्यक्रम-उपक्रम अत्यंत यशस्वीपणे राबविले. ‘अमर हिंद मंडळा’चे हे कर्यक्रम-उपक्रम मंडळाच्या ‘कलाविभागा’तर्फे आणि ‘क्रीड विभागा’तर्फे आयोजित केले जातात.

मंडळाचा क्रीडा विभाग हा महाराष्ट्रातील एक अत्यंत अग्रेसर आणि कार्यक्षम विभाग आहे. मंडळाचे कबड्डी तसेच खो खोचे प्रत्येकी चार चार संघ महाराष्ट्र, मुंबईभर होणा-या अनेक स्पर्धांमध्ये सतत अग्रक्रमामध्ये असतात. मंडळाने अनेक राष्ट्रीय खेळाडू घडविले आहेत. परिसरातील सर्वसामान्य कुटुंबातील सुमारे १०० ते १२५ मुलं-मुली दररोज मंडळाच्या मैदानात कबड्डी, खो-खो यासारख्या मराठी मातीतील खेळांचा सराव करीत असतात.

खेळाडूंना अनेक सवलती, शैक्षणिक शिष्यवृत्ती, गुणगौरव, वैद्यकीय मदत मंडळातर्फे वेळोवेळी केली जाते. मंडळाच्या क्रीडा विभागातर्फे दरवर्षी सराव शिबिरे, शालेय, जिल्हा, जोड जिल्हा, राज्यस्तरीय कबड्डी खोखोच्या स्पर्धा, आयोजित केल्या जातात. मंडळाच्या खेळाडूंचा विमा उतरवणारी कदाचित ही एकमेव संस्था असेल.

‘अमर हिंद मंडळा’च्या कलाविभाग गेली अनेक वर्षे अनेक कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित करून सांस्कृतिक आणि कलाक्षेत्रात मंडळाचा ठसा उमटविण्यास मदत करीत आहे.

* सांस्कृतिक क्रमावल्या * कै. आबा पडते राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा * कै. विनोद हडप राज्यस्तरीय एकांकिका लेखन स्पर्धा * आरोग्य सल्ला * बालनाट्य निर्मिती * बालनाट्य प्रशिक्षण शिबीर फ्रेण्डशीप डॉटकॉम * कै. उमेश शेणॉय राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा असे अनेक कार्यक्रम–उपक्रम मंडळ वर्षभरात आयोजिक करीत असते.

वसंत व्याख्यानमालेद्वारे थोरामोठ्यांचे, विद्वज्जनांचे विचारधन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या मुख्य हेतूने स्थापन झालेले ‘अमर हिंद मंडळ’ आज आपल्या शाखांद्वारे अनेक समाजोपयोगी कार्यक्रम-उपक्रम राबवीत असते.

या सर्व कार्यकम – उपक्रमांची विस्तृत माहिती वाचकांना त्या त्या विभागात वाचावयास मिळेल. आपण ती जरूर वाचावी आणि त्यांचा लाभ घ्यावा.

‘अमर हिंद मंडळा’वर स्नेहवर्षाव करणारे आपल्यासारखे वाचक आणि कार्यक्रम – उपक्रमांचा लाभ घेणारे श्रोते रसिक हेच आमचे प्रेरणास्थान आहे.

वाचकांनी आपल्या प्रतिक्रिया जरूर सुचवाव्यात.

मंडळाच्या ह्या इमेल पत्त्यावर जरूर कळवाव्या. contact@amarhindmandal.com

धन्यवाद!

संघटक पुरस्कार

अनु. संघटक पुरस्कार वर्ष फोटो
1 कै. उमेश शेणॉय २००१-०२